“महर्षी कर्वे यांचा अप्रकाशित इतिहाससुद्धा प्रेरणादायी !” – विनिता देशपांडे
महर्षी कर्वे यांची १६७ वी जयंती कर्वे संस्थेत उत्साहात साजरी
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६७ वी जयंती दि. १८ एप्रिल रोजी पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे साजरी केली गेली. सकाळी कर्वेनगरमधील महर्षी कर्वे यांच्या समाधीस्थळी सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी महर्षी कर्वे यांचे पणतू श्री. अरुण नेने तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री. सुनंदन लेले इ. मान्यवर उपस्थित होते. कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यानंतर कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे पुतळ्यासही मानवंदना दिली गेली.
या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या दिवसाच्या निमित्ताने संपदा बेकरीच्या माजी विद्यार्थिनी-कर्मचाऱ्यांचे एक स्नेहमिलन सिद्धिविनायक महाविद्यालयामध्ये पार पडले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमती विनिता देशपांडे यांचे ‘संस्था इतिहासातील अप्रकाशित पैलू’ या विषयावरील एक विशेष व्याख्यान वास्तुशास्त्र महाविद्यालयामध्ये आज पार पडले. संस्थेच्या पहिल्या सभेचा वृत्तांत, कार्यप्रणालीचे टप्पे, या कामांतील अण्णांची तळमळ, हिशेबातील चोखपण, देश-विदेशांत अण्णांच्या कार्याची घेतलेली दखल, विदेशातून आपल्या मुलींसाठी शिष्यवृत्ती मिळविण्याचे अण्णांचे प्रयत्न, वर्ल्ड पीस सोसायटीतील अण्णांचे सदस्यत्व, काशी विश्वविद्यालय स्थापनेत अण्णांचा महत्वपूर्ण सहभाग, मदनमोहन मालवीय, रवींद्रनाथ टागोर, अॅनी बेझंट, महात्मा गांधी अशा ज्येष्ठांशी अण्णांचे आत्मीय संबंध आणि या सर्वांचा संस्थेसाठी अण्णांनी करुन घेतलेला उपयोग याखेरीज अण्णांनी केलेले अनुवाद कार्य असे अनेक अप्रकाशित पैलू या सादरीकरणातून उलगडले गेले.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांच्यासह उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, वित्त समिती अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली बोरनारकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेच्या प्रथेप्रमाणे उपस्थितांना ‘डाळ व पन्हे’ देऊन समारोहाची सांगता झाली.