कर्वे संस्थेमध्ये शिवजयंती साजरी

MKSSs-2    27-Feb-2024
Total Views |
'आपले अस्तित्व छत्रपती शिवाजीमहाराजांमुळेच' - अॅड. अभिजीत देशमुख
कर्वे संस्थेमध्ये शिवजयंती साजरी
------------------------------------------

Shiv Jayanti 2024
दि. १९ फेब्रुवारी - अवघ्या भारतवर्षाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला गेला. या प्रसंगी संस्थेतील विद्यार्थिनी, कर्मचारी, व्यवस्थापक मंडळ सदस्य या सर्वांनी एकत्रित येऊन कर्वेनगर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केलं होतं. संस्थेच्या मुख्य आवारामध्ये सर्वप्रथम शिवरायांची आरती करून ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ झाली. सुमारे तासभर चाललेल्या या शोभायात्रेमध्ये विद्यार्थिनींचे ढोलताशा पथक, लेझीम पथक उत्साहाने संमिलित झाले होते. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराचे उद्घोष कानावर पडत होते. शोभायात्रेचे विसर्जन झाल्यानंतर संस्थेच्या मुख्य आवारातील इचलकरंजी सभागृहामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. युवा शिवचरित्र अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. अभिजीत देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री जयंत इनामदार, संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री आणि उपसचिव श्री प्रदीप वाजे हे मान्यवर उपस्थित होते. रमा सदन वसतिगृहातील विद्यार्थिनींनी गायिलेल्या छत्रपती शिवरायांच्या आरतीने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यानंतर वक्त्यांचा‌ परिचय आणि औपचारिक स्वागत केले गेले. वसतिगृहातील विद्यार्थिनी कु. वैष्णवी चव्हाण हिने अफजलखान वधाचा पोवाडा उत्स्फूर्तपणे सादर करून सर्वांची दाद मिळवली.

आपल्या प्रमुख व्याख्यानामध्ये सर्वांना संबोधित करताना श्री अभिजीत देशमुख यांनी पुणे हे विद्येचे माहेरघर असून कर्वे यांची संस्था हे पुण्यातील विद्येचे प्रमुख केंद्र आहे अशा शब्दात महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव केला आणि या संस्थेतील विद्यार्थिनींसमोर शिवचरित्र मांडण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब असल्याचे स्पष्ट केले. शिवजयंती तारखेने करायची की तिथीने याबाबत वाद न घालता खरे तर ती रोज साजरी करायला हवी, याचा अर्थच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण रोजच करायला हवे, याचे कारण आज आपली हिंदू म्हणून असलेली ओळख ही केवळ छत्रपती शिवरायांमुळेच आहे असे ते म्हणाले. आपल्या व्याख्यानात पुढील मुद्द्यांच्या आधारे त्यांनी छत्रपती शिवरायांची थोरवी स्पष्ट केली -
 
"उत्तरेतील कवी भूषण हा शिवरायांचा समकालीन होता. कवी भूषणाने शिवाजी महाराजांचा गौरव '...त्यों म्लेंच्छ वंसपर सेर सिवराज है' अशा यथोचित शब्दांमध्ये करून ठेवलेला असून त्याद्वारे महाराजांची थोरवी आपल्या लक्षात येऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा कोणाचा असेल तर तो त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांचा. आपल्या येथील सर्व मुलींनी या जिजाऊचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायला हवा. शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊंच्याच संस्कारांचा साक्षात्कार होय. इथल्या स्त्रीशक्तीचा शिवरायांनी कायमच सन्मान केला. आदिशक्ती भवानी ही शिवरायांची कुलदेवता होती. रांझे गावच्या पाटलाने एका स्त्रीशी गैरवर्तन केल्याची बातमी शिवाजी महाराजांना समजल्यानंतर या दूर्वर्तनी पाटलाचे हातपाय तोडण्याची सजा देत शिवाजी महाराजांनी ती तात्काळ अमलात आणली होती. यामुळे स्वाभाविकच स्त्रीशी गैरवर्तन करणाऱ्यांना मोठी जरब बसली. इस्लामिक शासनामध्ये होणारी स्त्री ची आत्यंतिक विटंबना महाराजांमुळेच थांबली."
 
"शिवाजी महाराजांचे चरित्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुद्धा मार्गदर्शक आहे. स्वराज्यावर झालेल्या पहिल्या फत्तेखानाच्या आक्रमणामध्ये पुरंदर किल्ल्यावरून केवळ दगडधोंड्यांचा उपयोग करून शिवरायांनी आणि त्यांच्या साथीदारांनी फत्तेखानाला नेस्तनाबूत केले होते. वेळप्रसंगी हाती असेल ते साधन वापरून आपले ध्येय कसे साध्य करायचे, याची शिकवण अशा अनेक प्रसंगांमधून आपल्याला मिळते. नंतर झालेल्या अफझलखानाच्या आक्रमणाच्या वेळी पवित्र देवालयांची विटंबना होऊन देखील महाराज स्थिर राहिले आणि अनेक युक्त्या करून अफजलखानाला आपल्या सोयीच्या रणक्षेत्रात येण्यास त्यांनी भाग पाडले. योग्य वेळ येताच त्याचा कायमचा नायनाटही महाराजांनी करून टाकला. शिवाय हे करत असताना अफजलखानासोबत आलेले सर्व व्यापारी आपलेसे करून त्यांचा मुद्देमालही खरेदीच्या निमित्ताने आपल्याकडे ठेवून घेतला, तो कायमचाच. या एका प्रसंगांमध्ये शिवरायांचा मानसशास्त्र, भूगोल, व्यवस्थापन, अर्थनीती, व्यवहारकौशल्य या सर्व गोष्टींचा उत्कृष्ट अभ्यास आणि यशस्वी प्रयोग आपल्याला दिसून येतो."
 
"सर्व पंथ आणि मतांचा आदर करणारे शिवाजी महाराज हिंदू धर्माचे प्रचंड अभिमानी सुद्धा होते त्यामुळेच गोव्यामध्ये जुन्या सप्तकोटेश्वर मंदिरावर जेव्हा चर्चचे आक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी स्वतः सप्तकोटेश्वराचा जिर्णोद्धार केलेला आहे. गोव्यामध्ये हा सप्तकोटेश्वर आजही विद्यमान आहे. स्वधर्मासोबतच स्वभाषेबद्दलही महाराज अत्यंत आग्रही होते म्हणूनच नंतरच्या काळामध्ये त्यांनी राज्यव्यवहारकोशाची रचना केली आणि त्या काळी प्रचलित असलेल्या फारसी, अरबी शब्दांना ऐवजी संस्कृत आणि प्राकृतातले शब्द त्यांनी आग्रहपूर्वक प्रचलित केले."
 
"स्वराज्याचा प्रपंच मांडत असताना महाराजांनी स्वतःच्या परिवाराचा विचार कायम दुय्यम स्थानावर ठेवला. समोर असलेल्या या मूर्तिमंत आदर्शामुळेच सुभेदार तानाजी मालुसरे 'आधी लगीन कोंढाण्याचे' असे म्हणू शकले. अर्थात हा प्रभाव त्यांच्या सर्वच सवंगड्यांवर पडलेला आपल्याला दिसून येतो. पुरंदरच्या तहामध्ये मिळवलेले सर्व राज्य गमावण्याची वेळ आलेली असताना देखील हा युगपुरुष डगमगला नाही. उलट आग्र्याच्या कैदेतून हिकमतीने सुटका करून घेतल्यानंतर त्यांनी पुनश्च आपले किल्ले जिंकून घेण्यास प्रारंभ केला आणि अल्पावधीतच स्वराज्याचे वैभव पुन्हा एकदा उभे केले. स्वराज्यामध्ये ३५० किल्ल्यांचे साम्राज्य उभे करताना 'माझा एक एक किल्ला किमान एक एक वर्ष भांडेल' असा विश्वास या राजाला होता, जो पुढे त्यांच्या साथीदारांनी सार्थही ठरवला. या विलक्षण चरित्राचा वारसा आपण जपायला हवा. म्हणजेच छत्रपती शिवराय हे केवळ व्याख्यान अथवा कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आजच्या काळातील आव्हानांना सामोरे जाता यावे याकरिता त्यांचे आदर्श आपण आचरणातही आणण्याची आवश्यकता आहे."
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महिलाश्रम माध्यमिक विद्यालयाच्या श्रीमती वैशाली पोतदार यांनी केले तर बाया कर्वे वसतिगृहातील कु. रेणुका धुमाळ हिने गायलेल्या समर्थ रामदासरचित शिवस्तवनाने या कार्यक्रमाची सुश्राव्य सांगता झाली.