कर्वे संस्थेत ‘करियर गायडन्स एक्सपो’

12 Feb 2024 14:15:09
दि. ४ नोव्हेंबर २०२३ – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम के एस एस एस करियर गायडन्स एक्सपो २०२३’ हा नव्या करिअर संबंधी विद्यार्थ्यांना माहिती देणारा अभिनव कार्यक्रम संस्थेच्या डॉक्टर भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या ठिकाणी संपन्न होत असून यात संस्थेच्या उच्च शिक्षण विभागातील १६ शाखांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज पार पडले. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि शैक्षणिक संप्रेषण संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वसुधा कामत या आभासी पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. सोबत प्रोसेशीया (पी. एल. एम.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष कुलकर्णी तसेच टेक्नोमेक इंजीनियरिंग च्या संचालिका श्रीमती माधवी लाहिरी, प्रसिद्ध डिजायनर श्री. राजू पन्ना हे मान्यवरही उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री. जयंत इनामदार, सी. ए. अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
 
या सोहळ्यात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून एक्सपो चे औपचारिक उद्घाटन करून त्यातील स्टॉल्सची पाहणी केली. यानंतर पुढील सत्रे महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. शास्त्री यांनी केले. आपल्या बोलण्यात त्यांनी महर्षी कर्वे यांच्या कल्पक दूरदृष्टीचा उल्लेख करत त्या काळात शिक्षणाद्वारे स्त्री सक्षमीकरण हा अत्यंत अभिनव असल्याचे सांगितले. ‘हीच दृष्टी ठेवून संस्था आजही कार्यरत आहे. शिक्षण हे कधीही लिंगसापेक्ष असू शकत नाही म्हणूनच शिक्षणाची आणि बदलत्या काळातील करिअर्सची संधी सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे. ‘करियर एक्सपो’चा हेतु हाच असून विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा’, असेही ते म्हणाले.
 
आपले मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांनी संस्थेच्या १२७ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचा उल्लेख केला आणि संस्थेचे सर्व उपक्रम हे शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरण या सुत्रांना धरूनच होत असतात, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचा लाभ घेत असतानाच या परिसरातील पवित्र वास्तूंनाही भेट देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
 
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. वसुधा कामत यांनी आपले उद्बोधन नवीन शैक्षणिक धोरणाबाबतच्या एका सादरीकरणाद्वारे मांडले. ‘नवीन शैक्षणिक धोरण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला यथोचित न्याय देणारे आहे’ हे त्यांनी विविध उदाहरणांमधून स्पष्ट केले. ‘या धोरणामध्ये करियरची क्षेत्रे आता बंदिस्त असणार नाहीत, तर प्रत्येक करियरशी निगडित विशिष्ट कौशल्ये शिकण्याची आणि ती वृद्धिंगत करण्याची पूर्ण मुभा यात प्रत्येकाला असेल. तसेच अशा प्रकारे घेतलेले शिक्षण सामाजिक हितासाठी योग्य तऱ्हेने वापरण्याचा विचारही या धोरणात अंतर्भूत आहे. अशा ‘एकात्मिक उच्च शिक्षणा’चा (integrated higher education) लाभ आता नवीन पिढीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘करियर गायडन्स एक्सपो’ सारखा उपक्रम खरोखरीच प्रशंसनीय आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे’ असेही त्या म्हणाल्या.
 
करियर गायडन्स एक्सपो’ च्या आयोजिका डॉ. मंजू हुंडेकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले आणि श्रीमती संपदा वर्धे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Powered By Sangraha 9.0